महाराष्ट्र राज्य
कार्यक्षेत्र असणाऱ्या स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेची पावस येथील शाखा सोमवारपासून (ता. १५) स्व वास्तूमध्ये स्थलांतरित होणार आहे. दिमाखदार वास्तू, अद्ययावत यंत्रणा, उत्तम प्रतिचे आणि आकर्षक फर्निचर असणारी ही वास्तू आहे. ग्राहकांना तत्काळ सर्व सेवा देण्यास तत्पर असणारी पावस शाखा प्रसिद्ध आहे. गेली १९ वर्षे पावस येथे पतसंस्थेची शाखा कार्यरत असून १०० टक्के वसुली आहे. उद्या सकाळी १०.३० वाजता शाखेचे उद्घाटन पतसंस्था अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांच्या हस्ते होणार आहे.
१९ वर्ष उत्तम व्यवसाय करत स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने मोठा ग्राहक वर्ग जपला आहे. सध्या ८ हजारांहून अधिक ग्राहक आहेत. सर्व जातीधर्मातील लोकांना सहकार चळवळीशी संलग्न करून घेतले आहे. पावस परिसरात विश्वासार्ह सेवा देत ४२ कोटींचा संमिश्र व्यवसाय पावस शाखेने केला. सोनेतारण कर्ज, जामीन कर्ज, आंबा
व्यावसायिकांना कर्ज दिली आहेत. कर्जदारही प्रामाणिकपणे नियमित कर्जफेड करत आहेत. स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या १७ शाखा आहेत. या पैकी ६ शाखा स्वमालकीच्या जागेत स्थानापन्न झाल्या आहेत. आता त्यात पावस शाखेची भर पडणार आहे. पतसंस्थेच्या नवीन वास्तू उद्घाटन सोहळ्याला ग्राहकही उपस्थित राहणार आहेत. या वेळी काही मान्यवर ग्राहकांचा सन्मान करण्यात येणार आहे. पावस पंचक्रोशीत अर्थकारणाला गती देण्याचे काम स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने केले आहे. स्वामी स्वरूपानंद यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या पावसमध्ये स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला स्वामींचे आशीर्वाद लाभले आहेत. उद्घाटनाला उपस्थित राहण्याचे आवाहन उपाध्यक्ष माधव गोगटे, व्यवस्थापक मोहन बापट, उपव्यवस्थापक हेमंत रेडीज, शाखाधिकारी विशाल सावंत यांनी केले आहे.
